Saturday, January 21, 2017

नाताळबाबा

मिंट कॉलनीच्या वरच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहणार्या पोरट्यांनी हे बाहुल बनवलय..भारीए ना..निळा शर्ट त्याच्यावर काळ जँकेट , डोळ्यावर गाँगल, कानात हेडफोन, समोर देशी विदेशी ब्रँड..भेंडी अजून काय पाहिजे एका बाहुल्याला आयुष्यात??...त्यालापण एव्हाना माहित झाल असेल 31 st ला ही पोरटी आपल्याला बळीचा बकरा बनवणार ते...हे बनवणारी कलाकार मंडळी कुठे दिसली नाहीत पण हे बाहुल मात्र रस्त्यात उभ्या असलेल्या डिक्टो बेवड्यागत दिसतय..

आपण त्या बाहुल्याच्या तोंडाला जबरदस्ती नाताळबाबाच मास्क लावून जाळून टाकायचो हे आठवतय का??...मग हा नक्की नाताळबाबा की जिंगल बँल हे ठरवायला आपल्याला वेळ नसायचा...नाताळमध्ये रात्रीचे घराबाहेरचे गिफ्ट कधी मिळाले नव्हते..म्हणून याच्याबद्दल जास्त आपुलकी नसावी कदाचित..
नाताळची सुट्टी पडली की असे धंदे सुचायचे..मग नाताळबाबासाठी कपडे प्रत्येकाने घरून आणायचे ..त्यातल्यात्यात मोठ्या माणसाचा शर्ट आणि पँटमध्ये बाकीचे कपडे भरायचे..कपडे कमी पडलेकी थोडीशी रद्दी टाकून जागा भरून लेवल करून घ्यायची..शर्टाची बटण , पँटची चैन लावून व्यवस्थित शिलाई मारायची..31st च्याआधी त्यातून काही बाहेर येईल अशी चिंधीगीरी खपवून घेत जात नसे..ही शिलाई मारत असताना कोणतरी फटाके आणून बाहुल्याच्या आत टाकून जायचा हे शेवटाला फटाके वाजल्यावरच कळायच..बरर..हे बाहुल सर्वांना दिसेल अशा ठिकाणी मैदानात ठेवलेले असायच.. चोरू नये म्हणून कुठेतरी रात्री लपवून ठेवायच..पण चोरी व्हायचीच..मग सीआयडीची टीम बाहुल्याच्या शोधात बाहेर पडायची..तोपर्यंत बाकीच्यांनी चोरांच्या आईबहीणीचा उद्धार करायच..काही पोरटी तर घरातला माणूस मेल्यागत रडायची..तेव्हाचा बेस्ट ईमोशनल सिन असायचा तो...मग 31 st च्या रात्री मढ्यावरून त्याच प्रेत फिरवत गल्लीभर मोठमोठ्याने बोंबा ठोकायच्या..बाहुल्याला आग लागली म्हणजे एक वर्ष संपून नव वर्ष सूरू झाल.
बाहुले जळत गेले तशी वर्ष संपत गेली...हुशश..आता लहानपणीचे मित्र मोठे झालेयत...काम करूनच दमतात...भेटत नाहीत लेकाचे..पण बाहुला बनवायच किती मेहनत, जबाबदारीच काम होत....आठ तास ड्युटी करण्याइतक सोपं व्हय ते?..ख्या..ख्या..

शाळा

आयुष्यातल्या चार शाळांपैकी ही दुसरी शाळा.. पू.प्रा. शाळा गवाणे ( गवळीवाडी)... दुसरी पर्यंत मुंबई शिकल्यानंतर पुढची चार वर्ष कोकणात गेली. तिसरीला या शाळेत प्रवेश घेतला. गवळीवाडीतपण खालची वाडी, वरची वाडी, मधली वाडी आणि गोपाळ वाडी अशा चार छोट्या वाड्या. गोपाळ वाडी थोडीशी लांब. तर आमची मधली वाडी आणि गोपाळवाडीच्या मधोमध ही शाळा. चौथीपर्यंत इथ शिक्षण..त्यामूळे आमच्याआधीच्या पिढीकडे दाखविण्यासाठी याच शाळेचा काय तो दाखला. त्यावेळी चारही वाडीतल्या आम्हा पोरांचा इथे गलबला असायचा. दाभोळकर,तटकरे, कोटकर, गवळी, गोपाळे सगळ्यांचीच पहीली पिढी नूकतीच शाळेत जाऊ लागली होती. जवळ अजून कोणती शाळा नव्हती..दोन कि.मीवर देवध्यात मोठी शाळा आणि पाच कि.मीवर लांज्यात तालूक्याची शाळा. त्यामूळे आमची पिढी याच शाळेत शिकलेली.

शाळेच्या समोर भल मोठ जांभळाच झाड अजूनही तसच दिसतय. याला बारीक बारीक जांभळ यायची. मला ही जांभळ कधी आवडली नाहीत. दात पानचट व्हायचे, पचपचीत लागायची नूसती. शाळेच्या आवारातच झाड असल्याने मधल्या सुट्टीत तिथे सर्व एकत्र व्हायचो.
तटाच्या पलीकडेच भूताचा आंबा. या भूताच्या आंब्याजवळून गेल्यावर आजी रस्त्यावरची माती अंगावरू काढत काहीतरी पूटपूटायची. कधी एकटा असल्यावर स्वत:च्या अंगावरून माती काढायचो. कधी कोण्या पाहूण्यांसोबत लहान मुल असेल तर त्यांनाही माती टाकायला सांगायचो. मग ते माझ कौतूक करायचे. मुंबईतला असूनपन किती हुशार आहे वैगेरे अस म्हणायचे..मलापण खूप बर वाटायच..(तेव्हा रात्रीस खेळ चाले नाही लागायच, तरीही)असो..
तर शाळेच्या या वरांड्यात आम्ही एकसुरात प्रार्थना म्हणून मग दोन वर्गात चार इयत्ता बसायचो. पानगले गुरूजी नुकतेच मुख्याध्यापक म्हणून आलेले. सफेद हाफ शर्ट, मोरपीसी पँट,तीक्ष्ण नजर, गुरूजींची आठवण आली की आजही भिती वाटते. पण गुरूजींनी शाळेला खर्या अर्थाने शिस्त लावली. स्काँलरशिप आणि गणितामुळे गुरूजींच्या हातचा प्रसाद चांगला आठवतोय. एकदा लाकडी पट्टी लपवली तर एक मुलगी म्हटली गुरूजी, माझ्या बँगेत दुसरी पट्टी आहे. (नेहमी खरे बोलावे खूप मनावर घेतलल काहींनी )पावसाळ्यात हिरव्यागार निगडीच्या झाडाच्या शिमट्या लाकडी पट्ट्यांना आँप्शन होत्या. त्या काढूनपण आम्हीच आणायच्या. भर पावसाळ्यात जंगलाला आग लागावी अस वाटायच. आभ्यास आणि शिस्तीसाठी तो धाक गरजेचा होता. गावकरांचा विनायक (बाबू) आपला खास दोस्त. तो खो-खो मध्ये एक्सपर्ट होता. त्याला शिकायची आवड नव्हती. चड्डी ओली होणे हा वाक्प्रचार परीक्षेत आला असता तर उदाहरणात मी बाबूच नाव लिहल असत.
हा तर..गुरूजी सर्वांवर खुप प्रेमपण करायचे. सर्व गोष्टीत मदत करायचे. गुरूजींनी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात आम्हाला सर्वांना घेतल. मी एका ग्रुप डान्समध्ये (गोंधळ) होतो आणि गुरूजींनी एक सोलो परफोर्मन्स मला शिकवला होता.
रात्री शाळेच्या वर्हांड्यात गँसच्या बत्तीवर कार्यक्रम सुरू झाला. आमचा गोंधळही (ग्रुपडान्स) सुरू झाला. काळोखाचा फायदा घेऊन आम्हीपण मनासारख्या (आठवल्या तेवढ्या) स्टेप मारल्या. सर्वात शेवटी आपला भिकार्याचा परफोर्मन्स..वर्हांड्यांतच..गुरूजींनी शिकवलेल तस करायच..फाटलेले कपडे, हातात डबा, ओवर-मेक आणि काही संवाद आणि गाण.."चार दिवसाचा भूकेने प्राण चालला..भिक वाढा या गरीबाला...डब्ब्यात पैसे गोळा होत होते. तसाच थेट आईच्या जवळ गेलो तर आईच्या डोळ्यात पाणी..मीपण भोकाट पसरल..कार्यक्रम औपचारीकता न करता संपलेला..
असो..या वर्हांड्यातच आम्ही खूप काही शिकलो. अभ्यास, परीक्षा, स्पर्धा सर्व काही वर्हांड्यातच. आता वाडीत घर खूप वाढलीएत पण शाळेची पटसंख्या जेमतेम वीसच..बाकीची मूल तालूक्याच्या शाळेत शिकतात. कधी सुट्टीत गावी गेल्यावर वर्हांड्यात आवर्जून जातो..त्याच्याशी बोलतो...तोच सांगत होता काही जून्या आठवणी.